
सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सोमवारी सकाळी अग्नितांडव पाहायला मिळाले. शहरातील स्टील-फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून पती-पत्नीसह गर्भवती मुलगी आणि नातीचा मृत्यू झाला. सुदैवाने दोन मुलांना प्रसंगावधान राखत गॅलरीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.
विष्णू जोशी (वय – 50), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (वय – 47), गरोदर पत्नी प्रियंका इंगळे (वय – 28) आणि तीन वर्षांची नात सृष्टी अशी मृतांची नावे असून मनीष (वय – 25) व सूरज (वय – 22) यांनी गॅलरीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला.
विटा शहरातील सावरकरनगर येथे विष्णू जोशी यांचे ‘जय हनुमान स्टील सेंटर’ हे भांडी व फर्निचरचे दुकान आहे. दुकाच्या तळमजल्यावर भांडी, पहिल्या मजल्यावर लाकडी फर्निचर, गाडीचे साहित्य असून वरच्या मजल्यावर जोशी कुटुंब वास्तव्यास आहे. दुकानाच्या आतील बाजूसच जीना असून याचा वापर जोशी कुटुंब ये-जा करण्यासाठी करते. सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास दुकानाला आग लागलीय. दुकानाचे दोन्ही शटर बंद होते आणि जोशी कुटुंब वरच्या मजल्यावर होते. आग लागल्याचे दिसताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला.
आगीने रौद्ररूप धारण केल्याने जोशी कुटुंबाला जीन्यावरून खाली येता आले नाही. बघता बघता आग दुसऱ्या मजल्यावर पसरली. या दरम्यान मनीष आणि सूरज यांनी गॅलरीतून उडी घेतली. मात्र विष्णू जोशी, त्यांची पत्नी सुनंदा, गर्भवती पत्नी प्रियंका आणि तीन वर्षांची नात सृष्टी यांना बाहेर पडता आले नाही. आगीत होरपळून चौघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, सांगलीचे खासदार विशाल पाटील, पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.



























































