
ब्रह्मोस, टेस्ला आणि अॅव्हेंजर्सवरून होत असलेला रेल्वेच्या तिकीट बुकिंगचा मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. या यंत्रणांवरून अवघ्या 10 सेकंदांत तिकीट गायब होत आहेत. एकीकडे तुम्हाला ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बराच काळ तिष्ठत बसावे लागत असताना आणि त्यानंतरदेखील कन्फर्म तिकीट मिळण्याची खात्री नसताना दुसरीकडे या यंत्रणा बिनदिक्कतपणे अवघ्या काही सेकंदांमध्ये कन्फर्म तिकीट घेऊन जात आहेत.
रेल्वे ऑनलाइन बुकिंगसाठी हॅकर्सनी विशिष्ट प्रकारची यंत्रणा तयार केली आहे. त्या माध्यमातून अगदी काही सेकंदांमध्ये कन्फर्म तिकीट काढले जात आहे. परिणामी मोठय़ा संख्येने सामान्य प्रवासी कन्फर्म तिकिटापासून वंचित राहत आहेत. यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स तयार करण्यात आले आहेत. ‘ब्रह्मोस’, ‘टेस्ला’, ‘अॅव्हेंजर्स’ अशी नावे या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्सला देण्यात आली आहेत. यावरून आयआरसीटीसीच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीतील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत.
काही अवैध प्रणाली या सुरक्षा यंत्रणा पार करण्यात यशस्वी होत आहेत. प्रतिमहिना फक्त 1500 ते 2500 रुपये शुल्काच्या मोबदल्यात हे सॉफ्टवेअर्स संबंधित कंपन्या विकत आहेत. यात तिकीट बुकिंगची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. यातल्याच ब्रह्मोस यंत्रणेवर प्रति पीएनआर 99 रुपये शुल्क आकारले जाते. अशा प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटे उपलब्ध करून देताना जास्त किंमत लावली जाते. स्लीपर कोचच्या एका तिकिटाची किंमत 800 रुपये असल्यास त्याची प्रवाशांना विक्री 2000 रुपयांना केली जात आहे.
ब्रह्मोस, टेस्ला, अॅव्हेंजर्स कसे काम करतात?
सामान्यपणे जनरल श्रेणीचे तिकीट प्रवासाच्या 60 दिवस आधी सुरू होते. सकाळी 8 वाजता बुकिंगसाठी ही तिकिटे उपलब्ध केली जातात. हॅकर्सच्या प्रणालींमध्ये प्रवाशाचे नाव, वय या बाबी आधीच नोंद करून ठेवलेल्या असतात. त्यांचे कोडिंगही आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील कोडनुसार करण्यात आलेले असते. सकाळी 8 वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू होण्याच्या आधीच ही प्रणाली कार्यरत झालेली असते. जिथे सामान्य प्रवाशांना बुकिंग करताना आधी नाव, वय, प्रवासाची माहिती अशा गोष्टी एकानंतर एक भराव्या लागतात, मग ओटीपी, कॅप्चा कोड भरणे अशा प्रक्रिया एकानंतर एक पार पाडाव्या लागतात, तिथे या प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी या सगळ्या प्रक्रिया अगदी काही सेकंदांमध्ये पूर्ण होतात आणि 15 सेकंदांच्या आत तिकीट बुकदेखील होते.























































