शस्त्रे विक्रीच्या तयारीत असलेल्यांना अटक, दोन पिस्तुल, जिवंत काडतुसे केली जप्त

शस्त्र विकण्यासाठी तयारीत आलेल्या एकाला पंत नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्या आरोपीला बेड्या ठोकून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी राजस्थानहून शस्त्र विक्रीसाठी मुंबईला घेऊन आला होता.

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील बेस्ट बस आगाराजवळ एक व्यक्ती बेकारदेशीरपणे शस्त्र विकण्यासाठी येणार असल्याची खबर पंत नगर पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी साध्या वेशात सापळा रचला. सदर व्यक्ती तेथे येताच त्याच्यावर पोलिसांनी झडप घातली. त्याच्या अंगझडतीत दोन पिस्तूल व चार जिवंत काडतुसे मिळाली. अजय कायता असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानच्या खंडवाडा गावचा रहिवाशी आहे. त्याने हे शस्त्र कुठून आणले व ते तो कोणाला विकणार होता याचा पोलीस तपास करीत आहेत.