देशात दर तासाला नऊ बाइकस्वारांचा अपघातात मृत्यू

देशभरात अपघात होण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. देशभरात रस्ते अपघातात दर तासाला नऊ बाइकस्वारांचा मृत्यू होत आहे, अशी धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या एका आकडेवारीतून समोर आली आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण 45 टक्के झाले आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 30 टक्के होते.

2023 मध्ये एकूण अपघाती मृत्यूंपैकी 69 टक्के मृत्यू हे ग्रामीण भागात झाले आहेत, असे इंडियास्पेंडच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. गेल्या दशकभरात एकूण रस्ते अपघातातील मृत्यू 24 टक्क्यांनी वाढले आहेत. रस्त्याने पायी जाणाऱ्यांच्या घटनेतही तिप्पट वाढ झाली आहे, तर सायकलस्वारांच्या मृत्यूमध्ये 13 टक्के आणि दुचाकीस्वारांच्या मृत्यूमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. याउलट कार, बस, ट्रक आणि ऑटो यासारख्या इतर वाहनांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे.