
आळंदी येथील धर्मशाळेत विद्युत रोषणाईचे काम करण्यासाठी गेलेल्या वारकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. नितीन घोलप असे या वारकऱ्याचे नाव असून ते खालापूरच्या वणवे गावातील रहिवासी आहेत. घोलप हे आळंदीत विद्युत रोषणाईचे काम करत असताना त्यांना हाय टेन्शन वायरचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.
नितीन घोलप यांनी दरवर्षीप्रमाणे वणवे गावातील भैरवनाथ मंदिरात विद्युत रोषणाई केली. इथले काम पूर्ण झाल्यानंतर ते आळंदीतील धर्मशाळेच्या रोषणाईचे काम करण्यासाठी गेले होते. आज सकाळी ते धर्मशाळेच्या वर विद्युत तोरणांची जोडणी करण्यासाठी चढले होते. त्यावेळी शाळेच्या वरून गेलेल्या उच्चदाबाच्या वाहिनीचा त्यांना जोरदार झटका बसला. या धक्क्याने घोलप उंचावरून खाली कोसळले आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.



























































