
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासातून देशाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या या माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेल्या तब्बल 32 गाडय़ा वेगवेगळय़ा शहरांत नेऊन एकाच वेळी मोठे स्फोट घडवून आणण्याची दहशतवाद्यांची योजना होती. दिल्लीत स्फोट होईपर्यंत गृह खात्याला या भयंकर कटाचा थांगपत्ताही लागला नाही. आता गृह खाते जागे झाले असून या 32 गाडय़ा नेमक्या कुठे पार्क केल्या आहेत, याची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यामुळे अवघा देश स्फोटांच्या भीतीच्या सावटाखाली आहे.
लाल किल्ल्याजवळ आय-20 या कारच्या माध्यमातून स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटातील सहभागी आरोपींची चौकशी करताना फोर्ड इको-स्पोर्ट ही गाडीदेखील वापरण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी लाल रंगाची ब्रेझा ताब्यात घेतली. या तीन कारसह एकूण 32 जुन्या गाडय़ांचा एखाद्या बॉम्बसारखा वापर करण्यात येणार होता. त्यात स्फोटके बसवली जाणार होती, असे तपासात पुढे आले आहे. या गाडय़ा कोणत्या अवस्थेत आहेत, इतर कोणी त्या स्फोटासाठी तयार तर करत नाही ना, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
बॉम्ब बनवण्यासाठी 20 लाख रुपये उभे केले!
दिल्ली स्फोटातील आरोपी डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल, डॉ. शाहीन आणि मृत डॉ. उमर नबी यांनी सर्वांनी मिळून सुमारे 20 लाख रुपये जमा केले होते. हे 20 लाख रुपये उमरला देण्यात आले होते. यातील तीन लाखात त्याने गुरुग्राम, नूह व इतर ठिकाणांहून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे 20 क्विंटल मिश्रण खरेदी केले होते. स्फोटके बनवण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार होता.
दिल्ली स्फोटाचे दुबई कनेक्शन
दिल्ली बॉम्बस्फोटाचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेला डॉ. आदिल अहमदचा भाऊ मुझफ्फर हा सध्या दुबईत आहे. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानमार्गे तो दुबईला गेला, असे आदिलने पोलीस चौकशीत सांगितले. मुझफ्फरचे जैश-ए-मोहम्मदशी थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
अशी अद्दल घडवू की, जग बघत राहील! – अमित शहा
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या सूत्रधारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जोरदार इशारा दिला. ‘हल्ल्यातील दोषींना अशी अद्दल घडवू की, जग बघत राहील,’ असे शहा म्हणाले.
आठ जणांना प्रत्येकी चार टार्गेट
तपास अधिकाऱयांच्या माहितीनुसार, स्फोटाचा कट तडीस नेण्याचे काम आठ जणांना देण्यात आले होते. त्यांना प्रत्येकी चार ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचे टार्गेट होते. हे आठ जण आणखी एकाला सोबत घेऊन हे काम करणार होते. या अनुषंगाने संशयितांची चौकशी सुरू आहे.
उमरचा डीएनए जुळला!
दिल्लीत स्फोट झालेली आय-20 कार उमर उन नबी हाच चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्फोटानंतर कारमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले होते. मृतदेहाचे हे नमुने उमरच्या आईच्या डीएनएशी जुळले आहेत. स्फोट झाला त्यावेळी तो एकटाच कारमध्ये होता, हेही तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
- उमर आणि त्याचे साथीदार तुकाaची राजधानी अंकारातील व्यक्तीच्या संपर्कात होते. तो सूत्रे हलवत होता. ‘उकासा’ (स्पायडर) असे या हॅण्डलरचे टोपण नाव आहे. ‘सेशन अॅप’द्वारे तो संदेश पाठवत होता.


























































