
मुंब्रा बायपासवर शाळेच्या बसने अचानक पेट घेतला असल्याची घटना ताजी असताना आज विरारमध्ये एका स्कूल व्हॅनला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांची व्हॅन पेटत असल्याचे दिसताच ड्युटीवरील वाहतूक पोलीस देवदूत म्हणून धावले अन् मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत एकाही विद्यार्थ्याला इजा झाली नाही. पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केल `जात आहे. दरम्यान अशा घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
४ नोव्हेंबरला मुंब्रा-कौसा येथील सिम्बॉ यसिस शाळेची बस विद्यार्थ्यांना सोडून परतीच्या मार्गावर असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने बसला आग लागली. विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले आणि काही अंतरावर जाताच स्कूल बस पेटली सुदैवाने यात ३५ विद्यार्थी बचावले. असे असताना आज सकाळी विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शाळेच्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. दरम्यान पुलावरून चालणारे पादचारी आणि वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. भररस्त्यात पेटती स्कूल व्हॅन दिसताच वाहतूक पोलीस कैलास कोकाटे आणि पोलीस शिपाई सुभाष जाधव यांनी धाव घेत तत्काळ विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
ठाणे, कल्याण, वसई-विरार आदी शहरांत बहुतांश शाळकरी विद्यार्थी बसेस, रिक्षा तसेच अशा व्हॅनसारख्या वाहनातून प्रवास करतात. प्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनांची तपासणी तत्काळ करून घ्यावी, वाहने योग्य असतील तरच त्यांना परवानगी द्यावी. – अरुण शेडगे (पालक)
शॉर्टसर्किटमुळे आग
स्कूल व्हॅनमधून जवळपास ८ विद्यार्थी प्रवास करत होते. तर वाहनाची तपासणी केली असता शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि सतर्कतेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
शाळा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे
या घटनेनंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दरम्यान अशा वाढत्या घटनेमुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहनांची दुरुस्ती वेळेत करण्याची मागणी पालकांनी केली आहे




























































