वैद्यकीय सल्ल्यामुळे संजय राऊत आज वाढदिवशी कुणालाही भेटणार नाहीत

प्रकृती अस्वास्थ्यामुळे वैद्यकीय उपचार घेत असलेले ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा उद्या वाढदिवस आहे. मात्र काही दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने उद्या ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कोणालाही प्रत्यक्ष भेटणार नाहीत, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे भांडुप येथील निवासस्थानी आणि प्रभादेवी येथील ‘सामना’ कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवसेनेची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊत यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून तूर्त काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गेले काही दिवस ते केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. ‘सामना’साठी लिहिलेला अग्रलेख आणि सलाईनच्या सुया टोचलेला हात, असे छायाचित्र त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर टाकले तेव्हा  ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव झाला.

आपल्या वाढदिवशी संजय राऊत दरवर्षी शिवसैनिक आणि ‘सामना’च्या वाचकांच्या शुभेच्छा प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वीकारतात. यंदा मात्र वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना लोकांमध्ये थेट जाता येणार नाही. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.