IPL 2025 – जडेजाची ‘घरवापसी’, तर संजूने घातली पिवळी जर्सी; रात्रीतून 10 खेळाडूंची अदलाबदल

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेड शुक्रवारी पार पडली. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा आपल्या ताफ्यात समावेश करून घेतले आहे. संजूच्या बदल्यामध्ये चेन्नईने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा खेळाडू सॅम करन याला राजस्थानकडे सोपवले आहे. अर्थात या ट्रेडमुळे जडेजाचे नुकसान झाले आहे. चेन्नईने जडेजाला 18 कोटी रुपयांमध्ये घेतले होते, मात्र राजस्थानने त्यासाठी फक्त 14 कोटी मोजले आहेत.

रवींद्र जडेजा गेल्या 10 वर्षापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा कणा राहिलेला आहे. 2012 पासून चेन्नईकडून खेळत असूीन त्याने 2018, 2021 आणि 2023 मध्ये संघाला आयपीएल विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याने चेन्नईकडून दीडशेहून अधिक विकेट्स घेतल्या असून 2300 हून अधिक धावा केल्या आहेत.

दरम्यान, जडेजा आणि सॅम करन सारख्या स्टार खेळाडूंना सोडण्याचा निर्णय अत्यंत कठीण होता, असे सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक के.एक. विश्वनाथन यांनी म्हटले. अर्थात हा निर्णय दोघांच्या सहमतीने घेण्यात आला असल्याचे सांगत विश्ननाथन यांनी दोघांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

जडेजाची घरवापसी

रवींद्र जडेजाने आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले होते. 2010 मध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. 2012 ला तो चेन्नईच्या संघात आला. तेव्हापासून फक्त 2016 आणि 2017 वगळता तो चेन्नईकडून प्रत्येक हंगाम खेळला आहे. 2023 ला जडेजाने दोन चेंडूत 10 धावा ठोकत संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते. आता मात्र त्याला चेन्नईने सोडले असून त्याची राजस्थानमध्ये पुन्हा एकदा घरवापसी झाली आहे.

10 खेळाडूंचे अदलाबदल

संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थानला रवींद्र जडेजा आणि सॅम करन मिळाला आहे. यासह मोहम्मद शमी सनरायझर्स हैदराबाद संघातून लखनौ सुपर जायंट्स संघात गेला आहे. फिरकीपटू मयांक मार्कंडे याला मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले आहे. तर अर्जुन तेंडुलकर मुंबईतून लखनौच्या संघात ट्रेड झाला आहे. दुसरीकडे राजस्थानचा डावखुरा फलंदाज नितीश राणा दिल्ली कॅपिटल्सच्या संघात गेला आहे. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू डोनोवन फरेरा राजस्थान रॉयल्समध्ये पोहोचला आहे. गेल्या हंगामात लखनौकडून खेळलेल्या शार्दुल ठाकूर याला मुंबईने करारबद्ध केले आहे. तसेच गुजरात टायटन्सच्या शेरफेन रूदरफोर्ड यालाही मुंबईने 2.6 कोटी मोजून आपल्या संघात घेतले आहे.