
बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने शनिवारी दिल्लीत पहिली आढावा बैठक घेतली. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर निवडणूक हेराफेरीचा आरोप केला. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की पक्ष अनियमिततेचे पुरावे गोळा करत आहे आणि ते दोन आठवड्यांत देशासमोर सादर करेल.
काँग्रेसने या निवडणुकीत 61 जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांना फक्त सहा जागांवर विजय मिळाला. पक्षाचा मतांचा वाटा 8.71 टक्क्यांपर्यंत घसरला. 2020 मध्ये 70 जागांवर लढून 19 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना 9.6 टक्के मते मिळाली होती. अजय माकन म्हणाले की, सुरुवातीपासूनच निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यामुळे हे निकाल आश्चर्यकारक आहेत. आमचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी सतत अनियमितता नोंदवत आहेत. सर्व आघाडी पक्ष या निकालाला अनपेक्षित मानतात आणि चौकशीची मागणी करत आहेत.
या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित करत, निवडणूक निकालाच्या चौकशीची मागणी केली आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह होते. अशा परिस्थितीत, असे अनपेक्षित निकाल येणे साहजिक आहे, असे माकन म्हणाले. काँग्रेसच्या पराभवावर बोलताना माकन यांनी भाजपच्या स्ट्राइक रेटवर भाष्य केले. भाजपचा स्ट्राइक रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. 1984 मध्येही काँग्रेसचा स्ट्राइक रेटही असा नव्हता. काही तरी गडबड दिसते, असे माकन यांनी म्हटले आहे. हा निकाल अविश्वसनीय असून याची चौकशी व्हावी. तसेच, राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनियमिततेच्या तक्रारी येत आहेत. काँग्रेस पक्ष ‘फॉर्म 17 सी’ आणि मतदार याद्यांचा डेटा गोळा करत असून, लवकरच ठोस पुराव्यांसह माध्यमांसमोर येईल, असेही ते म्हणाले. काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत, ही प्रक्रिया संशयास्पद आहे असे म्हटले आहे.



























































