
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने कोटय़वधी ग्राहकांना जबर झटका दिला आहे. बँकेने प्रसिद्ध एमकॅश फिचर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा येत्या 1 डिसेंबरपासून कायमची बंद केली जाणार आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर 2025 नंतर ऑनलाइन एसबीआय आणि योनो लाइट प्लॅटफॉर्मवर एमकॅशच्या माध्यमातून पैसे पाठवणे आणि क्लेम करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. याचाच अर्थ 1 डिसेंबर 2025 पासून ही सेवा कायमची बंद केली जाईल. जे ग्राहक बँकिंग कामकाजासाठी या फिचरवर अवलंबून होते. त्यांना आता अन्य डिजिटल माध्यमांचा उपयोग करावा लागणार आहे. ही सेवा बंद होत असल्याने एसबीआयने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी यूपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएससारख्या आधुनिक आणि सुरक्षित पेमेंट पर्यायाचा उपयोग करावा. एमकॅश सेवा ही जुन्या सिस्टमवर चालणारी सेवा होती, असे बँकेने म्हटले.
काय होती सेवा?
एमकॅश सेवेद्वारे ग्राहक कोणत्याही बेनिफिशियरीला जोडलेला मोबाईल किंवा ई-मेल टाकून तत्काळ पैसे पाठवू शकत होते. ही सेवा छोटय़ा आणि त्वरित देवाणघेवाणीसाठी उपयोगी होती. जो कोणी ग्राहक एमकॅशद्वारे पैसे पाठवत होता त्यावेळी ज्याला पैसे पाठवले त्याला एक सुरक्षित लिंक मिळायची आणि 8 अंकांचा पासकोड मिळत होता. याद्वारे तो आपल्या कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकत होता.


























































