
1997 ते 2012 या काळात जन्मलेल्या मुलांना जेन झेड असे म्हणतात. जेन झेड युवकांना डिजिटल नेटीव्ज असेही म्हणतात. कारण इंटरनेट, सोशल मीडिया आणि अन्य विविध तंत्रज्ञानांच्या माध्यमांसह ही मुले मोठी झाली आहेत. मात्र तरीही यांचे वार्किंग करीअर सुरक्षित नसल्याचे दिसून येतेय. कारण कंपन्या सध्या जेनरेशन झेडवर भरवसा दाखवत नाहीत. जवळपास नोकरी देणाऱ्या 1 हजार मॅनेजरचा एक सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हेत 6 पैकी 1 हायरिंग मॅनेजर जेन झेड कर्मचाऱ्याला नोकरीवर ठेवण्यास संकोच करत आहेत, असे दिसून आलेय.
इंटेलिजेन्ट कॉमद्वारे सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या सर्व्हेतून समोर आलेय की, 60 टक्के हायरिंग मॅनेजरने जेनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकरी दिल्यानंतर काही महिन्यांतच त्यांना कामावरून काढले आहे. यामागे मोटिवेशन कमी, खराब कम्युनिकेशन स्किल्स आणि अनप्रोफेशनल वर्तवणूक ही प्रमुख कारणे होती.
कारणे काय?
1 हजारांपैकी जवळपास 500 कंपन्यांनी सांगितले की, युवा कर्मचाऱ्यांना नव्या गोष्टी शिकण्यात अडचणी येतात, तर 46 टक्के लोकांनी व्यावसायिकतेशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधले. अलीकडेच कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले जेन झेड कर्मचारी सतत कामाचा ताण सांभाळू शकत नाहीत असे 21 टक्के कंपन्यांनी सांगितले. 39 टक्के लोकांनी खराब कम्युनिकेशन स्किल्स, 38 टक्के लोकांनी जेनरेशन झेड कर्मचारी फिडबॅक देत नाहीत आणि 34 टक्के लोकांनी समस्या सोडवल्या जात नाहीत म्हणून जेनरेशन झेड कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वीच नोकरीवरून काढल्याचे सांगितले आहे.

























































