दिल्लीवर ड्रोन बॉम्बने हल्ला करण्याचा होता कट; आणखी एकाला अटक, बॉम्बस्फोटात बूटबॉम्बचा वापर उघडकीस

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एनआयएने श्रीनगर येथून उमरचा साथीदार जासीर बिलाल वाणी ऊर्फ दानिश याला अटक केली आहे. तो ड्रोनमध्ये बदल करण्यात तज्ञ असून त्यांचा दिल्लीत ड्रोन आणि रॉकेटने हल्ले करण्याचा कट होता. तसेच हा स्फोट ‘बूटबॉम्ब’ने घडविण्यात आला होता. त्यात अमोनियम नायट्रेटसह ट्रायअॅसीटोन ट्रायपेरॉक्साईड (टीएटीपी) या अतिशय घातक आणि प्रचंड संवेदनशील स्फोटकाचा वापर करण्यात आला होता. डॉ. उमर मोहम्मद याने घातलेल्या बुटांमध्ये बॉम्ब पेरण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.

लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 कारचा वापर करण्यात आला होता. या कारच्या चालकाच्या जागेवर बूट सापडला होता. त्यात स्फोटकांचे अंश सापडले. बॉम्ब या बुटातच पेरला होता आणि हाच पहिला ट्रिगर असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. फॉरेन्सिक पथकाला टायर आणि बुटातून टीएटीपी या स्फोटकाचे अवशेष सापडले. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी या स्फोटकाचा बराच मोठा साठा करून ठेवला होता, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.

जासीर बनवीत होता ड्रोन बॉम्ब  

उमरचा साथीदार जासीर हा मूळचा अनंतनाग येथील रहिवाशी आहे. त्याचाही दिल्ली बॉम्बस्फोटाच्या कटात सहभाग होता. तो ड्रोनतज्ञ आहे. दहशतवाद्यांना तो तांत्रिक मदत करीत होता. लहान कॅमेरे आणि लहान स्फोटके लावून ड्रोन बॉम्ब बनविण्याच्या प्रयत्नात होता. हमास तसेच युव्रेनने अशा प्रकारचे हल्ले केलेले आहेत. तसेच हल्ले दिल्लीत घडवून आणायची या डॉक्टर मॉडय़ूलची योजना होती.