देवेंद्र फडणवीस म्हणतात, शेतकऱ्यांना कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपर्यंत घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याच फडणवीस यांनी आज कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. पण कर्जमाफी हे शेती समस्येचा अंतिम उपाय नाही, अशी भूमिका मांडली. यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. आम्ही ती महत्त्वाचीच मानतो. पण कर्जमाफी हे शेती समस्येचा अंतिम उपाय नाही. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, पण भविष्यातील संकट टळत नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

शेती शाश्वत झाली पाहिजे

शेतीमध्ये शाश्वतता आणणे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट प्रकल्प आणि आधुनिक पद्धतींचा वापर हा काळाची गरज असून याच माध्यमातून शेती नफ्यात आणता येईल, असे फडणवीस म्हणाले.