
घाटकोपर पश्चिमेकडील ‘केव्हीके’ शाळेमध्ये आज पॅण्टीनमधील वडापाव खाल्ल्यानंतर 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक त्रास झालेल्या पाच मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर इतर मुलांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आले आहे.
घाटकोपरच्या श्रेयस सिनेमाजवळ ही खासगी शाळा आहे. सोमवारी सकाळच्या सत्रातील मुलांनी मधल्या सुट्टीत शाळेतील पॅण्टीनमधील वडापाव खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ, पोटदुखी तर काहींना उलटय़ा असा त्रास जाणवू लागला. 15 ते 20 विद्यार्थ्यांना कमी अधिक प्रमाणात हा त्रास जाणवू लागल्याने शाळा प्रशासनाने डॉक्टरांना बोलावून प्राथमिक उपचार केले. काही मुलांना पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही पालकांनी खासगी रुग्णालयात मुलांवर उपचार केले.
कॅण्टीनमधील पदार्थ तपासणीसाठी पाठवले
‘केव्हीके’ शाळेतील घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या ‘एन’ वॉर्ड ऑफिसकडून तातडीने टीम पाठवून पॅण्टीनमधील स्वच्छता, पदार्थ बनवण्याच्या पद्धतीची पाहणी करून सॅम्पल ताब्यात घेतले. हे पदार्थ पालिकेच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती ‘एन’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त बल्लाळे यांनी दिली.
शिवसेना मदतीला धावली
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर तातडीने योग्य उपचारांच्या मदतीसाठी शिवसेना विभागप्रमुख सुरेश पाटील, शाखाप्रमुख अजय भोसले यांनी शिव आरोग्य सेनेशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या. यानंतर मुंबई समन्वयक प्रकाश वाणी, महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, चंद्रकांत हळदणकर यांनी रुग्णालयात धाव घेत पालकांना सहकार्य केले. विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठीदेखील शिवसैनिकांनी मदत केली.






























































