धावती मुंबई मंदावली! महानगर गॅसचा सीएनजी पुरवठा विस्कळीत… टॅक्सी, रिक्षा आणि बसेसची सेवा कोलमडली! मुंबईकरांचे प्रचंड हाल!!

चेंबूरच्या ‘आरसीएफ’ कंपाऊंडजवळ ‘गेल’ पाइपलाइनमध्ये झालेल्या गळतीमुळे मुंबईतील ‘सीएनजी’ गॅस पुरवठा विस्कळीत झाला. रविवार दुपारपासून मंदावलेला गॅस पुरवठा आज दुसऱ्या दिवशीही पूर्ववत न झाल्याने टॅक्सी, रिक्षा आणि ‘बेस्ट’च्या बसगाडय़ांनाही गॅस मिळणे बंद झाले. त्यामुळे मुंबईची वाहतूक सेवा पुरती कोलमडली. रिक्षा, टॅक्सीसाठी तासन्तास वेटिंग, बसच्या कमतरतेमुळे प्रचंड गर्दीने मुंबई अक्षरशः मंदावली. परिणामी मुंबईकरांचे हाल झाले.

‘आरसीएफ’ पंपाऊंड येथील ‘गेल’च्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये रविवारी दुपारी बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण मुंबईभरात ‘सीएनजी’ मिळणे मुश्कील झाले. याचा मोठा परिणाम सोमवारी दिसून आला. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना रिक्शा, टॅक्सी मिळणे मुश्कील झाले. शालेय बसही गॅस नसल्याने अडकून पडल्या. परिणामी विद्यार्थ्यांची तारांबळ झाली. हीच स्थिती कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची झाली. रात्री उशिरापर्यंत हाच प्रकार सुरू असल्याने पूर्ण मुंबईभरात सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. याचा सर्वाधिक फटका मुंबई उपनगरासह ठाणे आणि नवी मुंबईलाही बसला.

ओलाउबेरही लुडकली

बेस्ट, रिक्षा-टॅक्सी संप झाला तर मुंबईकरांना ओला, उबेर आदी खासगी वाहतूक सेवेचा आधार असतो. मात्र बहुतांशी ओला-उबेर सीएनजी गॅसवर चालत असल्याने त्यांनाही गॅस तुटवडय़ाचा फटका बसल्याने ही सेवाही लुडकली.

असे आहे नेमपं कारण

चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाझर्स कंपाऊंडमधील ‘गेल’च्या मुख्य गॅस पाईपलाइनमध्ये बिघाड झाल्याने ‘वडाळा येथील ‘एजीएल’ सिटी गेट स्टेशन’ला जाणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण मुंबईभरात दिसून येत आहे.

आज दुपारपर्यंत हाल

गेल कंपनीची वडाळा सिटी टर्मिनलमधील पाईपलाइनची अजूनही दुरुस्ती युद्धपातीळीवर सुरू आहे. 18 नोव्हेंबर रोजीही ही दुरुस्ती कायम राहणार आहे. त्यामुळे ‘सीएनजी’ पुरवठा मंगळवारी दुपारनंतर पूर्ववत होण्याचा अंदाज महानगर गॅसकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवार दुपारपर्यंत मुंबईकरांचे हाल होणार आहेत. दरम्यान, काही सीएनजी पंपांना इतर सिटी टर्मिनसमधून गॅस पुरवठा सुरू असल्याचेही पेट्रोल-डिझेल असोसिएशनकडून सांगण्यात आले.

सीएनजीसाठी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

विशेषतः रविवारी दुपारनंतर गाडय़ांमधील ‘सीएनजी’ संपल्याचा परिणाम दिसू लागला. त्यामुळे बहुतांशी रिक्शा-टॅक्सीवाल्यांनी ‘सीएनजी’ पंपावर रांगा लावण्यास सुरूवात केली. शेकडो रिक्शा, टॅक्सी रात्रभर पंपावर गॅससाठी पंपावर रांगा लावून उभ्या होत्या. पण दिवसरात्र प्रतीक्षा करूनही त्यांना गॅस मिळाला नाही.