गुजरातमध्ये चालत्या रुग्णवाहिकेला भीषण आग, नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू

गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यातील मोडासा शहराजवळ मंगळवार पहाटे एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. या अपघातात एका नवजात बाळासह एक डॉक्टर आणि इतर दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोडासा-धनसुरा रस्त्यावर रात्री सुमारे एक वाजता रुग्णवाहिकेला आग लागली. जन्मानंतर आजारी असलेल्या एका दिवसाच्या बाळाला मोडासा येथील रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात नेले जात होते, तेव्हा हा अपघात झाला.

बाळ, त्याचे वडील जिग्नेश मोची (38), अहमदाबादचे डॉक्टर शांतिलाल रेंतिया (30) आणि अरवल्ली जिल्ह्यातील नर्स भुरीबेन मनात (23) यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की मोची यांचे दोन नातेवाईक, खासगी रुग्णवाहिका चालक आणि आणखी तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिग्नेश मोची हे शेजारच्या महिसागर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या नवजात बाळाचा जन्मानंतर मोडासातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेले जात असताना, अज्ञात कारणाने रस्त्यातच रुग्णवाहिकेला आग लागली.