
सीएनजीच्या तुटवड्यामुळे मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाला. जवळपास 80 टक्के टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर धावल्याच नाहीत, तर कमी संख्येत सेवेत धावलेल्या टॅक्सी आणि रिक्षांच्या चालकांनी प्रवाशांचा खिसा कापला. अधिकृत भाड्याच्या तुलनेत पाचपट भाडे उकळले. त्यामुळे दिवसभर प्रवाशांचे हाल होण्याबरोबर त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
रविवारी आरसीएफ पंपाऊंड येथे महानगर गॅस लिमिटेडच्या मोठय़ा गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला. त्याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या हजारो टॅक्सी आणि रिक्षांच्या सेवेवर झाला. मंगळवारी दुपारपर्यंत अनेक सीएनजी पंपांवर गॅस पुरवठा ठप्प होता. परिणामी, पंपांच्या आवारात टॅक्सी, रिक्षांबरोबर सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. याचा वाहतुकीवर परिणाम होऊन मुंबईकरांचे हाल झाले असतानाच रस्त्यावर धावलेल्या मोजक्या टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी प्रवाशांची ‘लुटालूट’ सुरू ठेवली. पश्चिम आणि पूर्व उपनगरात रिक्षाचालकांनी अधिकृत मीटरवरील भाड्याच्या चार ते पाचपट भाडे उकळले. अंधेरी परिसरात विमानतळ प्रवाशांना या लुटमारीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अंधेरी ते एमआयडीसी प्रवासात रिक्षाच्या मीटरवर 89 रुपये भाडे झाले होते, मात्र त्याऐवजी रिक्षाचालकाने 250 रुपये घेतल्याचा अनुभव अंधेरीतील रहिवासी दिनेश कांबळे यांनी सांगितला. सोमवारी रात्रीच्या सुमारास तर रिक्षाचालकांनी मनमानी भाडे वसूल केले.
80 टक्के रिक्षांची वाहतूक ठप्प; आर्थिक नुकसान
मुंबईच्या उपनगरांत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांचे प्रमाण 80 टक्क्यांच्या घरात आहे. सीएनजीच्या तुटवड्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत या सर्व रिक्षांची वाहतूक ठप्प झाली होती. यात प्रवाशांचे हाल होण्याबरोबर रिक्षाचालकांचे खूप नुकसान झाले. सायंकाळी सीएनजीचा पुरवठा कमी दाबाने सुरू झाला. मात्र पुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी काही तास लागले, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे पदाधिकारी थंपी कुरियन यांनी सांगितले.
सायंकाळी 4 नंतर मुंबईत सीएनजी पुरवठा पूर्ववत झाल्याचे महानगर गॅस कंपनीकडून सांगण्यात आले. तरीही रात्री उशिरापर्यंत सर्वच सीएनजी स्टेशनवर वाहनांच्या रांगा होत्या.



























































