200 कोटींचे आमिष दाखवून 30 कोटी हडपले, दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि पत्नीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बायोपिकच्या नावाखाली 200 कोटींचे आमिष दाखवून 30 कोटी रुपये हडपल्याप्रकरणी बॉलीवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट  आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट  यांच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये उदयपूर येथील दिनेश कटारिया याचाही समावेश आहे.

इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे मालक डॉ. अजय मुरडिया यांनी उदयपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विक्रम भट्ट आणि त्याच्या साथीदारांनी डॉ. मुरडिया यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ चित्रपट बनवण्याचे आमिष दाखवले. तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यावर 200 कोटी रुपये कमवण्याचे आश्वासनही दिले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, डॉ. अजय एका कार्यक्रमात ते दिनेश कटारिया यांना भेटले होते, त्यांनी त्यांना त्यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ बायोपिक बनवण्याचा सल्ला दिला. तसेच विक्रम भट्ट यांच्याशी मुंबईत भेट घालून दिली. डॉ. मुरडिया यांनी 31 मे 2024 रोजी 2.5 कोटी रुपये पाठवले. त्यानंतर त्यांना चार चित्रपटांचे आश्वासन देण्यात आले आणि ते पैसे सतत ट्रान्सफर करत राहिले. एकूण 30 कोटींहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विक्रम भट्ट यांनी त्यांना दुसऱया चित्रपटातही गुंतवणूक करण्यास सांगितले होते. तसेच संपूर्ण रक्कम  परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची पत्नी आणि मुलगीदेखील या चित्रपट निर्मितीत असल्याची माहिती दिली होती.