
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात डॉक्टरांचे टेरर मॉडय़ूल समोर आले त्या हरयाणातील अल फलाह समूहाचा अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी याला ईडीने आज अटक केली.
ईडीने समूहाशी संबंधित 19 ठिकाणी धाडी टाकल्या. त्यातून 48 लाख रुपये रोख व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अल फलाह विद्यापीठाला ’नॅक’ने मान्यता दिल्याचा खोटा दावा केला होता. त्याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर ईडीने कारवाई केली. अशा खोट्या दाव्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टची 1995 मध्ये स्थापना झाली होती. जवाद अहमद सिद्दीकी यांचेच ट्रस्टवर नियंत्रण आहे.
दरम्यान, जम्मू-कश्मीरच्या विशेष पथकाने आणखी एका डॉक्टर पती-पत्नीला अटक केली आहे. डॉ. उमर फरूख भट आणि डॉ. शाहजादा अख्तर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे.
न्यायालये आणि शाळेत बॉम्बची धमकी
आज दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासह 3 जिल्हा न्यायालये आणि 2 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. तपासणीनंतर या धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. पटियाळा हाऊस न्यायालयात दिल्ली बॉम्बस्पह्टातील एक मास्टर माइंड जासिर बिलाल वाणी याला एनआयए हजर करणार होते. जासिर याला न्यायालयाने 10 दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.


























































