‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्याने मागितली 2 लाखांची खंडणी! पवनचक्कीच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण; कार्यालयाची तोडफोड

ऊर्जा प्रकल्पांवर खंडणीसाठी आणि राजकीय प्रभाव दाखवून दबावतंत्र वापरण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. बीड जिह्यातील मस्साजोग येथील सौरउैर्जा प्रकल्पातील सिक्युरिटी गार्डला करण्यात आलेली मारहाण आणि खंडणी प्रकरण, त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या हे प्रकरण ताजे असतानाच पारनेर तालुक्यातील दरोडी येथे अगदी अशीच घटना घडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघू पवार हा या गुह्यातील मुख्य आरोपी असून, त्याच्यासोबतच्या सात-आठजणांच्या टोळक्याने थेट पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून दशहत माजवली. दरोडीतील सेनवियान पवनचक्की प्रकल्पातील सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले यास अमानुष मारहाण करत कार्यालयाची तोडफोड करत दरमहा दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली.

मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले (रा. कारेगाव, ता. पारनेर) हे दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात असताना मुख्य आरोपी विकास पवार हा कार्यालयात शिरला. त्याने घुले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हातातील कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलही फोडला. पवार मारहाण करत असताना सात ते आठजणांच्या टोळक्याने कार्यालयाची तोडफोड केली.

दरम्यान, ‘तुझ्या मालकाला सांग, पवनचक्की चालवायची असेल तर दरमहिन्याला दोन लाख रुपये मला द्यावे लागतील,’ अशी धमकी देत पवार याने घुले यांच्या खिशातील 22 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली, असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. यावेळी साइड इन्चार्ज किरण पवार हे घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी घुले यांची सुटका केली.

यापूर्वीही दमबाजी

यासंदर्भात ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी सांगितले की, ‘आरोपी पवार याने 5 नोव्हेंबर रोजीही कार्यालयात येऊन सिक्युरिटी गार्डला दमबाजी केली होती. पवार आणि त्याच्या टोळक्याने केलेल्या तोडफोडीमुळे कंपनीचे दररोज 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.’