
कर्नाटकात मन्न सुन्न करणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी भरती करण्यास मनाई केल्याने रुग्णालयातील कॉरिडोरमध्ये चालता चालताच महिलेची प्रसुती झाली. प्रसुतीवेळी बाळ जमिनीवर पडल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. रूपा करबन्नावर असे पीडित महिलेचे नाव आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पी.आर. हवनूर यांनी घटनेची पुष्टी करत प्रकरणाची चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.
कर्नाटकातील हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. राणेबेन्नूरजवळील काकोल गावातील रहिवासी रूपा करबन्नावर हिला कुटुंबीयांनी प्रसुतीसाठी हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात बेड खाली नसल्याने डॉक्टरांनी तिला भरती करण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
रुपाला प्रसूती वेदना वाढत असतानाही, तिला वॉर्डाबाहेर जमिनीवर बसवण्यात आले. प्रसूती कक्षात गर्दी असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणतीही त्वरित मदत देण्यास नकार दिला. मदतीसाठी वारंवार विनंती करूनही कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले, असे रूपाच्या बहिणीने सांगितले. दरम्यान, रूपा शौचालयात जात असताना अचानक कॉरिडॉरमध्ये बाळाचा जन्म झाला. जन्मानंतर नवजात बाळ जमिनीवर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर कुटुंबाने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वेळेवर बेड आणि वैद्यकीय मदत मिळाली असती तर बाळाचे प्राण वाचू शकले असते. कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक रहिवाशांनी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कारवाईची मागणी केली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये उपायुक्त, महिला आणि बाल विकास अधिकारी, बाल संरक्षण अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, तांत्रिक तज्ज्ञ आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश असेल. प्राथमिक तपासाच्या आधारे दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे हवनूर यांनी सांगितले. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.



























































