
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी, मॉस्कोने नवी दिल्लीला एक अत्यंत महत्त्वाचा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे हिंदुस्थानी हवाई सामर्थ्याला नवी दिशा मिळू शकते. हिंदुस्थानचे जुने मित्र राष्ट्र अशी रशियाची ओळख आहे. हिंदुस्थानच्या भविष्यातील गरजांसाठी Su-57 स्टील्थ फायटर जेटचे तंत्रज्ञान कोणत्याही अटीशर्तीशिवाय उपलब्ध करून देण्याची ऑफर दिली आहे.
रशियाच्या रोस्टेक (Rostec) समूहाचे सीईओ सर्गेई चेमेझोव्ह यांनी सांगितले की, या प्रस्तावानुसार सुरुवातीला Su-57 विमाने रशियातून पुरवली जातील आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे उत्पादन हिंदुस्थानमध्ये हलवले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मॉस्को इंजिन, सेन्सर्स आणि स्टील्थसह संपूर्ण पाचव्या जनरेशनची इकोसिस्टीम खुली करण्यास तयार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारची ऑफर कोणत्याही पाश्चात्य देशांना देण्यात आलेली नाही.
चेमेझोव्ह यांनी हिंदुस्थान-रशियाच्या ‘ऑल-वेदर’ भागीदारीवर जोर देत, संरक्षण उपकरणांबाबत हिंदुस्थानी बाजूने केलेली कोणतीही मागणी ‘पूर्णपणे स्वीकारार्ह’ असेल असे देखील स्पष्ट केले.
याव्यतिरिक्त, रशिया आपला सिंगल-इंजिन स्टील्थ फायटर Su-75 चेकमेट (Checkmate) देखील ऑफर करू शकतो, असे संरक्षण विश्लेषक विजांदर के ठाकूर यांनी नमूद केले आहे. त्यांच्या मते, याचे स्थानिक उत्पादन स्वस्त दरात ५व्या जनरेशनच्या विमानांची गरज पूर्ण करेल आणि ब्रह्मोस प्रमाणे अब्जावधींचा निर्यात महसूलही मिळवून देईल.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या २३व्या हिंदुस्थान-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन यांचा दौरा अपेक्षित आहे, ज्यात या संरक्षण करारांवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावामुळे हिंदुस्थानला आपले स्वतःचे सुधारित स्टील्थ लढाऊ विमाने विकसित करण्याची अभूतपूर्व संधी मिळू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.


























































