
बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाली आहे. पाटण्यातील गांधी मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात जनता दलचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे १४ आणि जेडीयू कोट्यातील ८ मंत्र्यांचा समावेश आहे. २६ नवीन मंत्र्यांमध्ये एक मुस्लिम आणि तीन महिलांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेले तीन आमदारही मंत्री झाले आहेत. यामध्येच नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. यातूनच बिहारच्या नवीन एनडीए सरकारमधील घराणेशाही दिसून आली आहे.
नेत्यांच्या मुला-मुलींची मंत्रिमंडळात वर्णी
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात नेत्यांच्या मुला-मुलींनाही संधी दिली आहे. माजी मंत्री आणि नेते महावीर चौधरी यांचे पुत्र अशोक चौधरी यांना जेडीयू कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. नवीन प्रसाद यांचे पुत्र नितीन नवीन यांनाही भाजप कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
यासोबतच जितन राम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन आणि उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार अजय निषाद यांच्या पत्नी रमा निषाद यांचाही भाजपच्या कोट्यातून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.




























































