
गेल्या काही महिन्यांत हिंदुस्थान आणि अमेरिकेदरम्यान टॅरिफ व अन्य मुद्द्यांवरून तणावाचे वातावरण आहे. अशातच दोन्ही देशांमध्ये मोठा शस्त्र करार झाला आहे. अमेरिकेने हिंदुस्थानसाठी 93 दशलक्ष शस्त्रास्त्र पॅकेजला मान्यता दिली आहे. यामध्ये जेव्हलिन क्षेपणास्त्रे, कमांड लाँच युनिट्स आणि एक्सकॅलिबर तोफखाना राऊंड्सचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून त्यांची मारक क्षमता, टार्गेटिंग अचूकता आणि ऑपरेशनल रेंज जगभरात ओळखली जाते. जमिनीवरील युद्धप्रकारात किंवा लक्ष्यांवर कारवाई करताना जेव्हलिन क्षेपणास्त्रांचे सामर्थ्य अतुलनीय मानले जाते.
- अमेरिकेने हिंदुस्थानसाठी 93 दशलक्ष डॉलर्सच्या शस्त्रास्त्र पॅकेजला मंजुरी दिली.
- या पॅकेजमध्ये 100 जेव्हलिन क्षेपणास्त्रे, 25 कमांड लाँच युनिट्स आणि 216 एक्सकॅलिबर राऊंड्सचा समावेश. जेव्हलिन ही खांद्यावरून सोडण्यात येणारी अँटी टँक क्षेपणास्त्रे आहेत. ती वरून अटॅक करतात.
- हा करार उभय देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करून भारताची संरक्षण क्षमता वाढवणार.
डीएससीएकडून मंजुरीची औपचारिक सूचना
अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने (डीएससीए) या प्रस्तावाची अधिकृत माहिती अमेरिकन काँग्रेसकडे पाठवली आहे. एजन्सीने स्पष्ट सांगितले आहे की हिंदुस्थानने या करारांतर्गत फक्त शस्त्रेच नव्हे, तर लाइफसायकल सपोर्ट, सुरक्षा तपासणी, ऑपरेटर प्रशिक्षण, लाँचर्सचे नूतनीकरण आणि तांत्रिक सहाय्य यांचीसुद्धा मागणी केली आहे. याचा अर्थ हिंदुस्थान ही शस्त्रे फक्त खरेदीच करणार नाही, तर त्यांचा दीर्घकालीन उपयोग, देखभाल आणि प्रशिक्षण यासाठी आवश्यक संपूर्ण समर्थन अमेरिकेकडून मिळणार आहे.
रशिया एसयू-57 चे पूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरणास तयार
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या भेटीआधीच मॉस्कोकडून हिंदुस्थानला महत्त्वपूर्ण प्रस्ताव देण्यात आला आहे. रशियाने त्यांचे अत्याधुनिक एसयू-57 पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट देऊ केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रशिया या जेटचे 100 टक्के तंत्रज्ञान हस्तांतरण आणि हिंदुस्थानातच परवानाधारक उत्पादन सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहे. हा प्रस्ताव हिंदुस्थान-रशिया यांच्यातील संरक्षण सहकार्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो.


























































