
तालुक्यातील लिंगदेव गावातील शेतकरी वाळीबा होलगीर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याच्या विरोधात अकोले तालुक्यातील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. कोल्हार घोटी रस्त्यावर लिंगदेव ग्रामस्थ, कानडी समाज आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अकोले शहरातील महात्मा फुले चौकात तब्बल दोन तास रास्ता रोको केला. आमदारांनी माफी मागितलीच पाहिजे; अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
विजेबाबत प्रश्न विचारला म्हणून मारहाण केल्याने डॉ. किरण लहामटेंविरोधात अकोले शहरासह तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. आज सकाळी 11 वाजता ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कोल्हार घोटी रस्त्यावर एकत्र जमले. शेतकरी वाळीबा होलगीर यांनी आपल्या समस्यांबाबत प्रश्न विचारल्याचा राग काढत आमदारांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यानंतर शेतकऱयांनी रास्ता रोको करत आमदार लहामटेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख, राष्ट्रवादीचे अमित भांगरे, ओबीसी संघटनेचे बाजीराव दराडे, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, राहुल देशमुख, चंद्रकांत गोंदके, भानुदास सदगीर, बबन सदगीर, स्वप्नील धांडे, पोपट चौधरी, राहुल बेनके यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी पोलीस निरीक्षक एम. एम. बोरसे व नायब तहसीलदार लोहारे यांना निवेदन दिले. आंदोलनानंतरही नागरिकांमध्ये संताप कायम असून, आमदारांनी माफी मागावी; अन्यथा फौजदारी गुन्हा नोंदविला जावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न – सदगीर
कानडी समाजाचे संघटक बबन सदगीर म्हणाले, सामान्य शेतकऱ्याने प्रश्न विचारला म्हणून आमदाराने मारहाण करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न असून, माफी न मागितल्यास आंदोलन पेटतच राहील, असा इशारा दिला.




























































