
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैश्विक दिव्यांगत्व प्रणालीचा आयडी व पासवर्ड चोरून शेकडो बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 9 आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश जाधव तपास करत आहेत.
तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथून 142 दिव्यांग प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांक नोंदवून संशयास्पदरीत्या वितरित करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक यांनी स्वतः या तपासात लक्ष घालून जिल्हा शल्यचिकित्सकांना तातडीने 142 प्रकरणांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या गंभीर गुह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तांत्रिक मदत घेऊन पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी सिव्हिल सर्जन यांना नोटीस
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून 142 दिव्यांग प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांकाने नोंदवून वितरित करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत अहिल्यानगर सिव्हिल सर्जन यांना नोटीस बजावण्यात आली असून, या प्रमाणपत्रांबाबत माहिती मागविण्यात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्राचा मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस तपासात जिल्हा रुग्णालयातून डबल जावक क्रमांकाची नोंद करून 142 प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही प्रमाणपत्रे संशयास्पद असून, याबाबत सिव्हिल सर्जन यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणांची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून मागविण्यात आली आहे.



























































