
पहिल्या कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानचा कर्मधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटीला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये यष्टीरक्षक बॅटर ऋषभ पंत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसेल. बीसीसीआयने ‘एक्स’वरून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे 22 नोव्हेंबर पासून गुवाहाटी येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीला तो मुकणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने पत्रक काढत दिली.
कोलकाता कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. दिवसाचा खेळ संपल्यानंतर गिलला तपाणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याला डॉक्टरांच्य निरीक्षणासाठी ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2025 रोजी तो गुवाहाटीला गेला. परंतु दुसरी कसोटी खेळण्यास तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अधिक तपासणीसाठी तो मुंबईला रवाना होणार असून त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करेल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.
🚨 Update 🚨#TeamIndia captain Shubman Gill, who suffered a neck injury during the first Test against South Africa, has been ruled out of the second Test in Guwahati.
Rishabh Pant will lead the team in the 2nd Test in his absence.
Details 🔽 | #INDvSA | @IDFCFIRSTBank…
— BCCI (@BCCI) November 21, 2025
वन डे मालिकेलाही मुकणार?
मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झालेला गिल वन डे मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. कसोटी मालिका संपताच हिंदुस्थान आणि आफ्रिकेत तीन वन डे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना 30 नोव्हेंबर, दुसरा 3 डिसेंबर आणि तिसरा 6 डिसेंबरला खेळला जाईल. वन डे मालिकेसाठी 23 नोव्हेंबर रोजी संघ निवडला जाणार आहे.
व्हाईट वॉशचं संकट
दरम्यान, कोलकाता कसोटीमध्ये आफ्रिकेने हिंदुस्थानपुढे विजयासाठी 124 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानने गिलची कमी जाणवली होती. हिंदुस्थानचा संघ 93 धावांमध्ये गारद झाला होता आणि 30 धावांनी ही कसोटी गमावली होती. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थान 0-1 असा पिछाडीवर असून व्हाईट वॉशचे संकट कायम आहे.




























































