स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’! भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? रोहित पवार यांचा सवाल

राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. हातात कमी दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांची विजयश्री खेचून आणण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र, सत्तेत असणाऱ्या आणि घराणेशाहीवरून आरोप करणारा भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट (X) करत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करत भाजपला खडा सवाल केला आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा”, असे रोहित पवार म्हणाले.

घराणेशाहीच्या मुद्द्याला हात घालत रोहित पवार यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, “घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत पक्षाच्या ‘तळागाळातल्या कार्यकर्त्यांना’ ‘न्याय’ देऊन पक्षांतर्गत ‘लोकशाही’ ‘मजबूत’ करत आपला पक्ष कसा #PARTY_WITH_DIFFERANCE आहे हे दाखवून दिलं. असो…! वर्षानुवर्षे भाजपसाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.