
कल्याणमध्ये 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये डोंबिवलीतील बेशिस्त चालकांच्या दंडाचा फैसला लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी लावलेली अवाचेसवा रक्कम कमी होणार असल्याने चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यावेळी ई-चलनाद्वारे लावण्यात आलेल्या दंडाच्या प्रकरणांचा झटपट निपटारा करण्यात येणार आहे.
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात दंडात्मक कारवाईसह विविध प्रलंबित खटल्यांचा तातडीने निपटारा करण्यात येणार आहे. चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने त्यांना ई-चलनाद्वारे नोटिसा पाठवण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही दंडाची रक्कम न भरल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.
5 डिसेंबरपूर्वी नावे नोंदवा
थकीत दंडाची पर्वा न करता काही वाहनचालक आपली वाहने चालवत असल्याचेही समोर आले आहे. ज्यांना आपल्या प्रकरणाचा त्वरित निपटारा करायचा आहे, अशा चालकांनी 5 डिसेंबरपूर्वी डोंबिवली पूर्व, रामनगर येथील वाहतूक शाखा कार्यालयात संपर्क साधावा, तसेच ई-चल नासंबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करून दंड रकमेचा भरणा करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले.





























































