मच्छीमारांना क्यूआर कोड ओळखपत्रे, केंद्र सरकारचे नवे नियम लागू

कधी हवामानात बदल तर कधी वादळी वाऱ्यांचा मारा याच्या तडाख्यात खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी अनेकदा सापडतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे मोठे आव्हान ठरते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रासह देशभरातील मच्छीमारांना क्यूआर कोड ओळखपत्रे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. समुद्रात एखादी बोट अडचणीत सापडल्यास क्यूआर कोडच्या मदतीने त्याचे लोकेशन कळणार असून त्वरित मदतही पोहोचवली जाणार आहे. याशिवाय एकूण 21 नियम लागू करण्यात आल्याने मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात तर हजारो कुटुंबे त्यावरच अवलंबून आहेत. या मच्छीमारांना खोल समुद्रात जाताना व मासेमारी झाल्यान-‘तर पुन्हा बंदराकडे परतताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नवे नियम व क्यूआर कोड ओळखपत्रांमुळे या मच्छीमारांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन दिले जाणार असून एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंग या हानीकारक पद्धतींवर बंदी घालण्यात आली आहे.

समुद्रात दूरवर जाणाऱ्या बोटींना ट्रान्सपोंडर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याकरिता मच्छीमारांना क्यूआर कोड किंवा फिशरमेन कार्ड देण्यात येईल. त्यामुळे सुरक्षा दलांना वॉच ठेवणे शक्य होणार आहे.

क्यूआर कोडमुळे सागरी सुरक्षेलादेखील मदत होणार आहे. तस्करी, दहशतवादी कारवाया, अवैध मासेमारी टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना हा क्यूआर कोड महत्त्वाचा ठरेल. यांत्रिक नौका व पारंपरिक नौका अशी विभागणी केली आहे. दंडात्मक तरतूद या नौकांच्या लांबीनुसार ठरवण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज बंधनकारक

खोल समुद्रात मासेमारी जाळे खेचण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. अशा नौकांसाठी संबंधित राज्य सरकारकडे नोंदणी करावी लागेल. त्याशिवाय केंद्र सरकारचीही परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. 24 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या यांत्रिक मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. विशेषतः बूमच्या सहाय्याने जाळी खेचणारे छोटे मच्छीमार, ट्रॉलर, पर्ससीनधारक यांचा त्यात समावेश आहे.