
सदाशिव पेठेतील सकाळ नेहमीप्रमाणेच सुरू झाली होती. पण २० नोव्हेंबरचा दिवस ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने यांच्या आयुष्यातील अजून एक सोन्याचा अध्याय ठरला. दैनंदिन कचरा संकलनाचे काम करताना त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेली एक बॅग दिसली. सुरुवातीला ती एखाद्या औषधाच्या दुकानाची असेल, असा विचार. पण बॅग उघडताच डोळे विस्फारावेत, अशी दहा लाख रुपयांची रोख रक्कम समोर!
गेल्या वीस वर्षांपासून सदाशिव पेठेत काम करणाऱ्या अंजू माने यांच्यासाठी हा प्रसंग नवा नव्हता. औषधांच्या बॅगा आधीही मिळाल्या होत्या. पण एवढी मोठी रक्कम, ही बॅग कोणातरी बेचैन नागरिकाची असावी, हे त्यांना जाणवत होते. म्हणून त्यांनी तातडीने परिसरातील ओळखीच्या लोकांमार्फत चौकशी सुरू केली. याचदरम्यान एक नागरिक अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधताना दिसला. अंजू माने यांनी त्यांना शांत बसवून पाणी दिले आणि बॅग त्यांचीच असल्याची खात्री करून दहा लाखांची रक्कम जशीच्या तशी परत केली.
हा प्रामाणिकपणा पाहून त्या नागरिकासह परिसरातील सर्व रहिवाशांनी अंजू माने यांचा सन्मान करण्याचा आग्रहच धरला. त्यांना साडी, रोख रक्कम देत सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. अंजू माने यांचा हा आदर्शवत प्रामाणिकपणा ‘स्वच्छ मॉडल’मध्ये नागरिक आणि कचरावेचक यांच्यात गेल्या दोन दशकांत बांधल्या गेलेल्या विश्वासाच्या नात्याचाच पुरावा आहे. पुण्यातील ४० लाख नागरिकांना ४००० स्वच्छ कचरावेचक दररोज सेवा देत असताना, अशा घटना या व्यवस्थेतील मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतात






























































