“झोपलेल्यांना जागं करू शकतो, पण जे जागे असूनही झोपेचे सोंग…”, राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या धनखड यांची फटकेबाजी

माजी राष्ट्रपती जगदीप धनखड हे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आरएसएसचे संयुक्त महासचिव मनमोहन वैद्य यांनी लिहिलेल्या ‘हम और यह विश्व’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात धनखड सहभागी झाले आणि त्यांनी विविध विषयांवर परखड भाष्यही केले. यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्याबाबतही सूचक विधान केले. मात्र वेळेअभावी आपण खोलात शिरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

जगदीप धनखड म्हणाले की, हल्ली लोक नैतिकता आणि अध्यात्मापासून दूर होत चालले आहेत. मी फ्लाइट पकडण्याच्या नादात माझे कर्तव्य विसरू शकत नाही आणि मित्रांना माझा अलीकडचा भूतकाळ याचा पुरावा आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या राजीनाम्याकडे सूचक इशारा केला. तसेच जे लोक झोपलेले आहेत त्यांना आपण जागे करू शकतो, पण जे झोपेचे सोंग घेऊन बसलेले आहेत त्यांना जागे करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

जगदीप धनखड यांनी यावेळी कोणत्या नरेटिव्हमध्ये न अडकण्याचा इशाराही दिला. नरेटिव्हमध्ये अडकले की बाहेर पडणे अवघड होते. देव करो आणि कुणीही अशा नरेटिव्हमध्ये अडकू नये. कारण एखादी व्यक्ती अशा चक्रव्युहामध्ये अडकली तर तिचे बाहेर पडणे अवघड आहे. इथे मी स्वत:चे उदाहरण देत नाही. लोक नरेटिव्हचा बळी बनवण्याचा प्रयत्न करतात. याच्याशी एकटी व्यक्ती नाही, पण संस्था लढू शकतात, असेही धनखड म्हणाले.

दरम्यान, जगदीप धनखड यांनी जुलै महिन्यामध्ये तब्येतीचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे तत्कालिन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विजय मिळवला होता.