अभिप्राय – उद्बोधक लेखन

>> ए. के. नाईक

प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवनकार्यासंबंधी माहितीपर काही पुस्तके मराठीत प्रकाशित झाली आहेत. पण या कुटुंबातील व्यक्तींवर एकत्रित माहिती असलेले ‘ठाकरे – प्रबोधनकार ते आदित्य’ असे पुस्तक प्रथमच मराठी साहित्य क्षेत्राच्या दालनात दाखल झाले आहे.

लेखक, पत्रकार आणि शिवसेना अभ्यासक योगेंद्र ठाकूर यांनी लेखन – संपादन केलेल्या या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. बहुजनांचे कैवारी असलेले ‘महाराष्ट्र भूषण’ प्रबोधनकार यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतिहासविषयक असलेले कार्य नव्या पिढीला कळण्यासाठी त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व रेखाटताना पुस्तकात ‘बाळासाहेब आणि शिवसेना’, ‘व्यंगचित्रकार अग्रलेखकार – बाळासाहेब’, ‘प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब’, ‘मराठी भाषाप्रेमी, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्ररक्षक बाळासाहेब’, ‘प्रखर राष्ट्रवादी बाळासाहेब’, ‘जातपात न पाळणारे बाळासाहेब’ यांच्याविषयी उद्बोधक लिखाण या पुस्तकात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजकारण, राजकारण आणि हिंदुत्वाचे विचार हे ठाकरे कुटुंबाचे सर्वसमावेशक हिंदुत्व असल्याचे दाखवते. ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आदित्य ठाकरे यांच्या रूपाने सक्रीय झाली आहे. या युवा नेतृत्वाविषयी थोडक्यात माहिती या पुस्तकात दिली आहे. यापूर्वीदेखील शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवरील काही पुस्तकांचे लिखाण योगेंद्र ठाकूर यांनी केले आहे. त्यात बाळासाहेब, ‘साहेब – एकच वाघ’, ‘शिवसेना ः समज – गैरसमज’, ‘शिवसेना 50’, ‘ठाकरे एक विचार धगधगता’ आदी पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रातील आजच्या परिस्थितीत व गोंधळलेल्या वातावरणात ठाकरे कुटुंबाचा आधार महाराष्ट्राला वाटतो हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न ‘ठाकरे – प्रबोधनकार ते आदित्य’ या पुस्तकात योगेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

ठाकरेप्रबोधनकार ते आदित्य 

लेखन व संपादन ः योगेंद्र ठाकूर

मूल्य ः 350 रुपये

प्रकाशक ः आमोद प्रकाशन, मुंबई