
हिंदुस्थानमध्ये दहशत पसरवण्याचा पाकिस्तानचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाळ केला असून ड्रोनद्वारे तस्करी करण्यात आलेल्या हत्यारांचा साठा जप्त केला आहे. या तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या चौघांना पोलिसांनी अटकही केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
ड्रोनचा वापर करून ही हत्यारे पंजाब सीमेवरून हिंदुस्थानात आणण्यात आली होती. इथे ती लॉरेन्स बिश्नोई, बंबीहा, गोगी आणि हिमांशु भाऊ या टोळ्यांना पुरवण्यात येणार होती. मात्र तत्पूर्वीच डीएसपी संजीप कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली पोलिसांच्या पथकाने ही शस्त्रास्त्र जप्त केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जप्त केलेल्या हत्यारांमध्ये 10 विदेशी सेमी-ऑटोमेटिक पिस्तूल, 92 जिवंत काडतुसांचा समावेश आहे. ही तुर्की बनावटीची पीएक्स 5.7 पिस्तूल असून याचा वापर स्पेशल फोर्स करते. तसेच जप्त केलेल्या हत्यारांमध्ये चिनी बनावटीची पीएक्स 3 ही पिस्तूलही आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी देवेश श्रीवास्तव यांनी दिली.
दरम्यान, अटक केलेले आरोपी पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. दिल्लीतील रोहिणी परिसरात छापा टाकून पोलिसांनी आरोपींना शस्त्रास्त्रांसह बेड्या ठोकल्या आहेत. सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.




























































