
देवदर्शनासाठी जात असतानाच गाडीचा टायर फुटल्याने अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. अन्य 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर शनिवारी दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व भाविक सोलापूरमधील उळे येथील रहिवासी असून ते क्रूझर गाडीने नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी चालले होते. यादरम्यान धाराशिवमधील अणदूरजवळ सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रूझर गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात तीन महिलांसह पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.





























































