
यंदा अतिवृष्टीमुळे सुपारी पिकालाही मोठा फटका बसला आहे. फळ परिपक्व होण्याआधीच फळगळती सुरू झाली आहे. अतिवृष्टीमुळे भात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र त्यात सुपारी पिकाचा समावेश नसल्याने सुपारी बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
धार्मिक विधींपासून ते माऊथ फ्रेशनर बनवण्यासाठी सुपारीचा वापर केला जातो. सुपारी फळाची लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात आहे. अशा या सुपारी पिकाला फळगळीचे ग्रहण लागून सुपारीची कोवळी फळे गळून खाली पडली आहेत. अतिपावसामुळे सुपारीला कोळेरोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळेच फळगळ होत असल्याचा सुपारी बागायतदारांचा दावा आहे.
शेतकऱ्यांनी फळगळ थांबण्यासाठी फवारण्यादेखील केल्या. परंतु त्याचा तितकासा परिणाम झाला नाही. झाडावरील 70 टक्क्यांपेक्षा अधिक फळे जमिनीवर पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि दापोली तालुका सुपारी संघाचे अध्यक्ष मधुकर दळवी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना लेखी पत्र देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
































































