
<<< राजाराम पवार >>>
शहरीकरण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे जैवविविधता झपाट्याने घटत आहे. दुर्मिळ पक्षी आणि जंगली प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या पिढीतील तरुणांना या दुर्मिळ कीटक, पक्ष्यांविषयी माहितीही होत नाही. या दुर्मिळ प्रजातींविषयी आपल्या नव्या पिढीला माहिती व्हावी, या प्रजातींचा इतिहास जोपासला जावा, यासाठी पुण्यातील एक टॅक्सिडर्मिस्ट कार्यरत आहे. त्याने शासनाच्या परवानगीने आजपर्यंत नैसर्गिक मृत्यू झालेल्या हजारो प्राण्यांचे स्टफ करून संवर्धन करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
नैसर्गिक इतिहासाचे जतन करण्यासाठी टॅक्सिडर्मी या कला विज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात टॅक्सिडर्मी क्षेत्रात मोजक्याच व्यक्ती काम करत असून, पुण्यातील कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केलेला रोहित खिंडकर हा तरुण गेल्या आठ वर्षांपासून ‘टॅक्सिडर्मी’ ही कलाही जोपासत आहे. हा तरुण आपल्या राष्ट्रातील प्राणी, संपत्ती असलेले दुर्मिळ कीटक, पक्ष्यांबरोबरच जंगली प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याने आजपर्यंत नैसर्गिक मृत्यू झालेल्या लहान मुंगीपासून ते आफ्रिकन पोपट, घुबड, बटवाघुळ, बगळा, बदक, लव्ह बर्ड्स, मैना, विविध जातींच्या कोंबड्या, रायनो बिटल, फुलपाखरे, विविध जातींचे मासे, अशा प्रजातींची प्रक्रिया करून संवर्धन करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. स्टफ केलेले कीटक, पक्षी किमान शंभर वर्षांहून अधिक काळ राहू शकतात, असे खिंडकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान यांसारख्या विविध राज्यांच्या वन विभागांनी रोहित यांच्याकडून अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि इतर प्रजातींचे नमुने जतन करून घेतले आहेत. तसेच हिंदुस्थान लष्कराच्या ब्रिटिशकालीन नैसर्गिक इतिहास संग्रहाचे जतन व संवर्धन करण्याच्या प्रकल्पात रोहित यांनी काम केले आहे. याबरोबरच देशभरातील अनेक महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कार्यशाळांद्वारे रोहित यांनी विद्यार्थ्यांना ‘टॅक्सिडर्मी’ची वैज्ञानिक प्रक्रिया, वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व आणि जैवविविधतेबाबत मार्गदर्शन केले आहे.
संशोधनात्मक अभ्यासासाठी उपयोग
बदलत्या काळानुसार अनेक कीटक, पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. अशा परिस्थितीत टॅक्सिडर्मी नमुन्यांमुळे विद्यार्थी आणि संशोधकांना दुर्मिळ प्रजातींच्या प्रत्यक्ष रचना अभ्यासण्यासाठी मदत होते. दुर्मिळ प्रजातींबद्दल जागरूकता वाढते. जैवविविधतेची शास्त्रीय नोंदवही म्हणून नमुन्यांची मदत होते. भविष्यातील वैज्ञानिक संशोधनासाठी हे नमुने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, असे रोहित यांनी सांगितले.
टॅक्सिडर्मी’ची आवड असल्यामुळे आठ वर्षांपासून ही कला जोपासत आहे. अनेक प्रजाती दुर्मिळ होत आहेत. या प्रजातींचे जतन केले नाही तर पुढील पिढ्यांना पुस्तकांमध्ये या दुर्मिळ प्रजाती पाहू शकतील. त्यामुळे नैसर्गिक जैवविविधतेचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे टॅक्सिडर्मिस्ट रोहित खिंडकर म्हणाले.

























































