
गेल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरांत थंडीची तीव्रता वाढली. सलग चार दिवस तापमान 16-17 अंशांच्या आसपास राहिले. त्यामुळे सुखद गारवा अनुभवणाऱ्या मुंबईकरांना रविवारी मात्र हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेने चिंतेत टाकले. सकाळी शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेला. हा निर्देशांक हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत दर्शवत आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भिती असल्याने सर्वांनी प्रदूषित हवेत जाणे टाळावे, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून दिला जात आहे.
मुंबईतील रविवारची सकाळ प्रदूषित हवेची ठरली आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ श्रेणीत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. AQI.in या संकेतस्थळावर हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची नोंद होते. रविवारी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी शहराचा एक्यूआय 210 अंकांच्या अत्यंत खराब पातळीवर नोंदवला गेला. या प्रदूषित हवेने सर्व वयोगटांतील मुंबईकरांची चिंता वाढवली आहे.
सकाळी उपनगरांतील तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअसच्या आल्हाददायक तापमान श्रेणीत असूनही प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांना जड आणि अस्वस्थ वाटत होते. पहाटेपासूनच धुके पसरले होते. त्यामुळे आकाश निस्तेज आणि अस्पष्ट दिसत होते. सूक्ष्म कणांचे उच्च प्रमाण हे यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. शहराच्या हवेतील PM2.5 पातळी प्रति घनमीटर सुमारे 134 मायक्रोग्राम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर PM10 पातळी प्रति घनमीटर सुमारे 169 मायक्रोग्राम असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही पातळी मानवी आरोग्यासाठी सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहेत.



























































