
एक्सप्रेस, मेल आणि उपनगरी गाड्यांमध्ये विनातिकिट, अवैध तिकिट आणि बुकिंग न केलेल्या सामानासह प्रवास करणाऱ्या 9.63 लाख प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. मुंबई विभागातील तिकिट तपासणी पथकाने अशा प्रवाशांकडून 40.59 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल-एक्सप्रेस गाड्या, वातानुकुलीत व गैर-वातानुकुलीत उपनगरी गाड्यांमधील अनियमित प्रवास रोखण्यासाठी नियमित विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल ते ऑक्टोबर 2025) दरम्यान, मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी मेल-एक्सप्रेस गाड्या, उपनगरी गाड्या तसेच वातानुकूलित उपनगरी गाड्यामध्ये मिळून 9.63 लाख अनियमित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एकूण 40.59 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केला.
एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील दंडवसूली पुढीलप्रमाणे
- वातानुकूलीत उपनगरी गाड्यांमधून 2.28 कोटी रुपये दंड वसूल
- प्रथम श्रेणी डब्यांमधून 2.93 कोटी रुपये दंड
- द्वितीय श्रेणी डब्यांमधून 33.69 कोटी रुपये दंड
- मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये भाडेफरकाच्या प्रकरणांमधून 0.71 कोटी रुपये दंड
- बुकिंग न केलेल्या सामानामधून 0.98 कोटी रुपये दंड
ऑक्टोबर 2025 महिन्यात एकूण 1.34 लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांची नोंद झाली असून 6.16 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
ऑक्टोबर 2025 मधील दंडवसूली पुढीलप्रमाणे
- वातानुकूलीत लोकलमधून 29.28 लाख रुपये दंड
- प्रथम श्रेणी डब्यांमधून 34.07 लाख रुपये दंड
- द्वितीय श्रेणी डब्यांमधून 5.21 कोटी रुपये दंड
- मेल व एक्सप्रेस गाड्यांतील भाडेफरक प्रकरणांमधून 1.92 लाख रुपये दंड
- बुकिंग न केलेल्या सामानामधून 1.25 लाख रुपये दंड
मध्य रेल्वेने मुंबई विभागातील वातानुकूलीत उपनगरी गाड्यांमध्ये आढळणाऱ्या अनियमित प्रवासाच्या समस्या लक्षात घेऊन एक विशेष वातानुकूलीत लोकल तिकीट तपासणी पथक नियुक्त केले आहे. मुंबई उपनगरी विभागात मध्य रेल्वेमार्फत दररोज 1,810 गाड्यांची वाहतूक केली जाते, यात 80 वातानुकूलीत लोकल सेवा समाविष्ट आहेत. या विशेष पथकाची नियुक्ती प्रवाशांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी करण्यात आली असून, यासाठी 24×7 कार्यरत व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांक 7208819987 उपलब्ध करून देण्यात आला आहे. वातानुकूलीत लोकल तिकीट तपासणी पथक दररोज सरासरी 1.19 लाख दंडाची वसुली करते.



























































