
आज दृष्ट लागण्याजोगी विश्वविजयी कामगिरी हिंदुस्थानच्या अंध महिला क्रिकेट संघाने करून दाखवली. कोलंबोचे पी. सारा ओवल स्टेडियम आज ‘दृष्टी’ नव्हे तर जिद्दीने मिळवलेल्या विजयाचा साक्षीदार होते. पहिल्या टी–20 अंध महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने नेपाळचा 7 विकेट राखून पराभव केला आणि अंध क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या विजेतेपदाचा मान हिंदुस्थानने मिळवला. यशामुळे देशांत स्फूर्तीचे नवे पर्व सुरू झाले आहे.
हिंदुस्थानी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे नेपाळची फलंदाजी 20 षटकांत 5 विकेट गमावून केवळ 114 धावाच करू शकली. प्रत्युत्तरात हिंदुस्थानने आत्मविश्वासपूर्ण खेळी साकारत 12 षटकांतच 3 विकेटच्या मोबदल्यात विश्वविजयी लक्ष्य गाठले आणि जगज्जेतेपदाचे चुंबन घेतले.
हिंदुस्थानच्या एकूण वर्चस्वाची साक्ष म्हणजे नेपाळला संपूर्ण डावात फक्त एकच चौकार मारता आला. फुला सरेनने फटक्यांची आतषबाजी करत नाबाद 44 धावा करून हिंदुस्थानचा डाव सांभाळला व डावातील सर्वोच्च खेळी साकारली. यापूर्वी उपांत्य फेरीत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा तर नेपाळने पाकिस्तानचा पराभव केला होता. या स्पर्धेचे सहयजमान श्रीलंकेला मात्र गृहमैदानाचा फायदा घेता आला नाही. प्रारंभीच्या पाच सामन्यांत त्यांना एकच विजय (अमेरिकेविरुद्ध) मिळवता आला.





























































