वृद्ध जोडप्याची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

cyber-police

डिजिटल अटकेच्या नावाखाली वृद्ध जोडप्याची फसवणूक करणाऱ्या तिघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. विलास मोरे ऊर्फ रेहान खान, रिझवान खान, कासीम शेख अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या तिघांकडून पोलिसांनी सहा मोबाईल जप्त केले आहेत.

तक्रारदार हे गोरेगाव येथे राहत असून ते ज्येष्ठ नागरिक आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांना एकाने फोन केला. त्याने तो ट्रायचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याच्या वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर झाला असून त्याच्या आधारे विविध बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याने मनी लॉण्डरिंगचा व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. त्याची चौकशी केली जाणार असल्याची भीती दाखवली.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह दिल्ली सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून अज्ञात व्यक्तीने चौकशी केली. त्याच्या चौकशीत तक्रारदार यांच्यासह त्याच्या पत्नीचा समावेश असल्याचे उघड झाले. त्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला असल्याच्या भूलथापा मारल्या. त्याचा विश्वास बसावा म्हणून त्यांना विविध सरकारी कार्यालयाचे पत्रे आणि कोर्टाची नोटीस पाठवली. त्यानंतर त्याना व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवर सर्व्हिलन्सवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. चौकशीच्या नावाखाली ठगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली.

पैशाचा व्यवहार सिक्रेट खात्यात घेऊन करावा लागेल. जर तसे केले नाही तर घरी पोलीस पाठवून अटक केली जाईल अशी भीती दाखवली. भीतीपोटी त्याने 4 कोटी 5 लाख 80 हजार रुपये ट्रान्सफर केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.