
मंदिरात चोरी करणाऱ्या एकाला दहिसर पोलिसांनी अटक केली. बादलकुमार दास असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम आणि वाहनाच्या बॅटरी जप्त केल्या आहेत. दासच्या अटकेने एका गुह्याची उकल करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे.
दहिसर येथे एक मंदिर आहे. त्या मंदिरात तक्रारदार हे ट्रस्टी म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी त्याने मंदिर बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात एक भाविक आला. त्याला मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने याची माहिती तक्रारदारांना दिली. मंदिरातील तीन दानपेट्यांतून आठ हजार रुपयांची रोकड चोरी झाली. याप्रकरणी तक्रारदारांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासासाठी एक पथक तयार केले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दासला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम आणि बॅटरी जप्त केल्या. काही दिवसांपूर्वी त्याने त्या बॅटऱ्या चोऱ्या केल्याचे त्यांनी सांगितले.

























































