मुंबई-गोवा महामार्गावर आली सात फुटी मगर

मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे शनिवारी मध्यरात्री एक मोठी मगर महामार्गावरून पलीकडे जात असताना बिबवणे येथील तरुणांना दिसली. त्यांनी सतर्कता दाखवून ते मगरीच्या मागावर राहिले. सर्व्हिस मार्गाकडील लोखंडी रोलिंगमुळे ती मगर पुढे न जाता साधारण पाऊण तास तेथेच थांबली. सात फूट लांबीची ही मगर मोकळ्या जागेत असल्याने तिला पकडणे जिकिरीचे होते. मगर कर्ली नदीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत होती. परंतु सर्व्हिस मार्गावरील रोलिंगमुळे तिला पुढे जाणे शक्य झाले नाही. ती त्याच ठिकाणी थांबली आणि ते तरुण तिच्यावर नजर ठेवून राहिल्याने ती काहीशी दचकून होती. अखेर वनविभागाच्या जलद बचाव कृती दलाने स्थानिक तरुणाच्या मदतीने त्या मगरीला शिताफीने पकडले. त्यानंतर रविवारी पहाटे त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.