IND Vs SA 2nd Test – रडत खडत टीम इंडियाची गाडी 200 पार, दक्षिण आफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी; आता गोलंदाजांची परीक्षा

गुवाहटीच्या बरसापारा येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 201 धावांवर संपुष्टात आला आहे. वॉशिंग्टन सुंदर (48) आणि कुलदीप यादव (19) यांनी डाव सावरल्यामुळे संघाला 200 चा टप्पा पार करण्यात यश आले. दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावाच्या आधारावर आता 288 धावांची आघाडी आहे.

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 489 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभी करण्याची संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांपूढे टीम इंडियाने नांगी टाकलीत आणि एका मागे एक फलंदाज माघारी परतत गेले. यशस्वी जयस्वालने 58 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त एकही फलंदाज दमदार फलंदाजी करू शकला नाही. 122 वर 7 विकेट अशी टीम इंडियाची अवस्था होती. परंतू वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी डाव सावरला. वॉशिंग्टन सुंदरने 92 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या तर, कुलदीप यादवने 134 चेंडूंचा सामना करत 19 धावा केल्या. कुलदीपने वॉशिंग्टला चांगली साथ दिली त्यामुळे टीम इंडियाची गाडी 200 पार गेली. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून 1.3 षटकांचा खेळ संपला तेव्हा त्यांनी बिनबाद 9 धावा केल्या होत्या.