
चार्टर्ड विमानाच्या पायलटने क्रू मेंबर तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बेंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पायलटविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित शरण असे आरोपी पायलटचे नाव आहे.
पीडित क्रू मेंबर तरुणी आणि दोन पुरुष पायलट 18 नोव्हेंबर रोजी बेगमपेट विमानतळावरून पुट्टपर्थी मार्गे बंगळुरूला विशेष चार्टर्ड विमानाने गेले होते. दुसऱ्या दिवशी दुसरे विमान चालवण्याचे नियोजित असल्याने तिघेही रात्री एका हॉटेलमध्ये थांबले होते. संध्याकाळी बाहेर फिरून आल्यानंतर रोहित आणि पीडितेने एकत्र सिगारेट ओढली. यानंतर पीडिता आपल्या रुममध्ये जायला निघाली असता आरोपीने आपल्या रुममध्ये तिला खेचून नेत तिच्यावर बलात्कार केला.
पीडिता 20 नोव्हेंबर रोजी हैदराबादला बेगमपेट विमानतळावर पोहोचल्यानंतर तिने विमान व्यवस्थापनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर बेगमपेट पोलीस ठाण्यात तिने औपचारिक तक्रार दाखल केली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा बेंगळुरूमध्ये घडला असल्याने प्रकरण तेथील अधिकारक्षेत्रातील पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
























































