बालमोहन विद्यामंदिर ‘सर्वोत्कृष्ट शाळा’

दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेला ‘जी’ साऊथ नॉर्थ वॉर्डमधील ‘सर्वोत्कृष्ट शाळा’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 53 व्या वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शनात आणि सहशालेय उपक्रम समितीतर्फे आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल शाळेला हा बहुमान मिळाला आहे.

विज्ञानाचे प्रकल्प तयार करण्यासाठी प्रीती बेंद्रे यांच्यासह सर्व विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. तर, सहशालेय उपक्रमांसाठी शिल्पा पटवर्धन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यांनी वाढवली शान

विद्यार्थी प्रकल्प सीनियर गटात रुद्र साबळे, चिन्मय जाधव यांनी पहिला क्रमांक पटकावला. दिव्यांग प्रकल्प गटात स्वामिनी धोत्रे व श्रीराज जंगम याने बाजी मारली. ज्युनियर गटात मिहिर देसाई व मुद्रा सावंत यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. टीचिंग एड सीनियर गटात जगदीश भालेराव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. पांडुरंग जोशी यांनी तृतीय तर निबंध लेखन सीनियर गटात तोषवी टापरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सहशालेय उपक्रम समितीच्या स्पर्धांमध्ये दुर्व दळवी, रुही बांधेकर, आर्या भगत, अर्जुन पुलकर्णी यांनी बाजी मारत शाळेची शान वाढवली. समूह गीत व लोकनृत्य (ज्युनियर गट) या स्पर्धांतही शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. जगदीश गवाळी यांनी टीचिंग एड ज्युनियर गटात उल्लेखनीय कामगिरी केली.