
उपचार पूर्ण होऊनही डिस्चार्ज न मिळालेले समरजीत सिंग यांना अखेर नानावटी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ‘दोन लाखांसाठी डिस्चार्ज रोखला’ असे वृत्त दैनिक ‘सामना’ने सोमवारी दिले होते. रुग्णालय प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन समरजीत सिंग यांना आज घरी सोडले.
ताप डोक्यात गेल्याने समरजीत सिंग हे मागील महिन्यात नानावटीमध्ये दाखल झाले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयाने डिस्चार्ज देणे अपेक्षित होते. मात्र तुमचे पैसे बाकी असल्याचे सांगून त्यांचा डिस्चार्ज रोखण्यात आला. पैसे देण्याची तयारी दाखवल्यावर आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे ते हतबल झाले. सिंग यांना डिस्चार्ज मिळावा यासाठी ‘कौंतेय प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेने सातत्याने पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींची भेट घेऊन रुग्णालयाला पत्रे देण्यात आली. तरीही रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिला. शेवटी रुग्णाने व्हिडिओ बनवून व्हायरल केला व जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. हे वृत्त ‘सामना’त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ हालचाली करून डिस्चार्ज पेपर तयार केले व रुग्णाला घरी सोडले. समरजीत सिंग यांच्या कुटुंबीयांनी मदतीबद्दल ‘सामना’चे आभार मानले.

























































