
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचाराने वेग धरला आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारात गुंतले आहेत. राज्याचे मंत्रीही प्रचाराच्या निमित्ताने आपापल्या जिह्यात तळ ठोकून आहेत. त्यामुळे उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुट्टी देण्यात आली आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या तोफा 30 नोव्हेंबरला थंडावतील. निवडणूक प्रचाराला जेमतेम पाच ते सहा दिवस उरल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपली संपूर्ण ताकद प्रचारात लावली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सदस्यांसह थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्याने उमेदवारांकडून पदयात्रा, छोट्या प्रचारसभांवर भर दिला जात आहे. याशिवाय उमेदवारांकडून पक्षाच्या स्टार नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्याची मागणी होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव येथे भाजपच्या उमेदवारांसाठी विजय संकल्प सभा घेतल्या तर बावनकुळे यांनी आज भंडारा जिह्यात प्रचारसभा केल्या. एकनाथ शिंदे यांनी आज जामखेड, मनमाड, नांदगाव, सटाणा, पिंपळगाव येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. अजित पवार यांनी आज नांदेड, परभणी जिह्यात तर सुनील तटकरे यांनी सोलापूर, सांगली जिह्यात प्रचार केला.

























































