
धारावीच्या मतदार यादीत जवळपास ७०,००० मतदारांची हेराफेरी झाली आहे, असा आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, “संपूर्ण धारावीमध्ये प्रत्येक प्रभागात ६,००० ते १०,००० मतदारांना त्यांच्या मूळ वॉर्डमधून दुसऱ्याच वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. उदाहरण द्यायचे तर, सोशल नगरसारखे संपूर्ण परिसर, तेथील मतदारांना काहीही संबंध नसलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहेत. जर हा केवळ बाजूच्या वॉर्डमध्ये गोंधळ असता, तर तो समजू शकतो. पण हे दूरच्या वॉर्डमध्ये पद्धतशीरपणे केलेले स्थलांतर आहे. याचा हेतू स्पष्ट आहे, मतदारांना संभ्रमात टाकणं, गोंधळ निर्माण करणे आहे.”
ज्योती गायकवाड म्हणाल्या की, “या मतदारयादीत आक्षेप आणि सूचनांसाठी आता जी फॉर्म्स दिली जात आहेत, ती फक्त वैयक्तिक नोंदींसाठी आहेत. मतदारांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराची तक्रार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. आम्हाला सांगण्यात आले की, प्रत्येक वॉर्ड मधून हलवलेल्या ६,००० ते १०,००० मतदारांसाठी स्वतंत्र फॉर्म भरावे लागतील. एका व्यक्तीने इतक्या कमी दिवसांत १०,००० फॉर्म कसे भरायचे ?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
त्या म्हणाल्या की, “संपूर्ण प्रक्रिया क्लिष्ट बनवून ठेवली आहे, म्हणजे आक्षेप नोंदवून देखील उपयोग होणार नाही, हा धारावीच्या मतदारांना निराश करण्याचा आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. धारावी काँग्रेस शांत बसणार नाही.”



























































